विजयादशमीला संघाच्या कार्यक्रमात होणार सहभागी!
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) नागपुरात आयोजित विजयादशमी समारंभाला यंदा इस्त्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे राहणार आहेत.
आगामी 12 ऑक्टोबर रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित संघाच्या कार्यक्रमात डॉ. राधाकृष्णन हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) वर्षप्रतिपदा (गुडी पाडवा), शिवराज्याभिषेक दिन, रक्षा बंधन, गुरू पौर्णिमा, विजयादशमी, मकरसंक्रांती असे 6 उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या आयोजनामागे संघाचे स्वतःचे असे तत्त्वज्ञान आहे.
नागपुरात आयोजित होणारा विजयादशमी उत्सव (Dussehra Melaka) आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची सांगता या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 25 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली होती. त्यामुळे विजयादशमी उत्सवाच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस देखील असतो. या दिवशी सरसंघचालक स्वयंसेवकांचे मार्गदर्शन करतात.
या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित केले जाते. यापूर्वी 5 ऑक्टोबर 2022 रोजी संघाच्या कार्यक्रमात गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य अतिथी म्हणून गौरवण्यात आले होते. तर गेल्यावर्षी 24 ऑक्टोबर 2023 रोजी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शकर महादेवन यांना बोलावण्यात आले होते. तर यंदा 12 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे राहणार आहेत.
डॉ. के राधाकृष्णन हे देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. ते भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1949 रोजी केरळमध्ये झाला. डॉ. राधाकृष्णन यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, त्रिवेंद्रम येथून बीएस्सी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आयआयटी खरगपूरमधून पीएचडी आणि आयआयएम बंगलोरमधून पीजीडीएम मिळवले.डॉ. राधाकृष्णन यांनी 1971 मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (एसएलव्ही) प्रकल्पात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालकही राहिले आहेत. डॉ. राधाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोने मंगळयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पाठवण्याचा चमत्कार केला, ही मोठी उपलब्धी आहे. डॉ. जी माधवन नायर यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी इस्रोचे अध्यक्षपद स्वीकारले. इस्त्रो प्रमुख म्हणून त्यांचे पहिले प्राधान्य जीएसएलव्हीसाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन विकसित करणे हे होते.
डॉ राधाकृष्णन 2009 ते 2014 या काळात इस्रोचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-1 मोहीम, मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) आणि उपग्रहांच्या जीसॅट मालिकेचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विविध क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात उपग्रह संचार, रिमोट सेन्सिंग आणि अवकाश विज्ञान यांचा समावेश आहे. 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्व आणि वैज्ञानिक योगदानासाठी त्यांना इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एनटीएमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितचे अध्यक्ष म्हणून के. राधाकृष्णन यांच्याकडे जबाबदारी आहे.