ग्रामीण भागात सेनेला नवी ताकद; ‘आमदार आपल्या दारी’ राज्यभर राबवा – एकनाथ शिंदे
By संतोष पाटील
पालघर : पालघर जिल्ह्यातील माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत पुन्हा ‘घरवापसी’ झाल्याची चर्चा असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमित घोडा यांनी भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
अमित घोडा यांनी भाजपमधील तालुकास्तरावरील अंतर्गत गटबाजी, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांतील नाराजी, आणि तलासरी तालुका अध्यक्ष निवडीतील वाद यामुळे नाराज होऊन अखेर भाजपचा राजीनामा दिला. माजी तालुका अध्यक्षाने नवीन अध्यक्षाच्या स्वागताचे बॅनर काढून टाकणे, ही घटना या असंतोषाचे जिवंत उदाहरण ठरली.
डहाणू आणि पालघर तालुक्यात अमित घोडा यांचा जनसंपर्क आणि प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. स्थानिक पातळीवर याचा निवडणुकांवर थेट परिणाम होईल, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. राजेंद्र गावित, आ. विलास तरे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, कुंदन संखे, तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमित घोडा यांचा शिवसेनेत प्रवेश शिंदे गटासाठी राजकीय संजीवनी ठरू शकतो. त्यांचे नेतृत्व, जनाधार आणि संघटन कौशल्य यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची पकड मजबूत होईल, असा विश्वास पक्षात आणि मतदारसंघात व्यक्त केला जात आहे.