महाड : महाड तालुक्यातील आरोग्य सेवा अक्षरशः ठप्प होईल अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील 6 पैकी 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (PHC) 102 अॅम्ब्युलन्सना इंधनपुरवठा थांबण्याची वेळ आली असून, इंधनाच्या तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका सेवाच धोक्यात आली आहे.
वरंध, बिरवाडी, पाचाड, विन्हेरे आणि चिंभावे या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा यात मुख्यतः समावेश असून, इंधनाअभावी अॅम्ब्युलन्स रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी महाड तालुका रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात हलवू शकत नाहीत. याचा गंभीर परिणाम अपघातग्रस्त, सर्पदंश–विंचूदंशग्रस्त, गरोदर माता आणि गंभीर आजारी रुग्णांवर होत आहे, ज्यामुळे अनेकांचे जीव अक्षरशः टांगणीला लागले आहेत.
निवडणूक तापली, पण आरोग्य व्यवस्था ठप्प — जनतेचा सवाल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते व्यस्त असताना, रुग्णवाहिकांना इंधन मिळत नाही ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे नागरिक सांगतात.
“निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करणारे नेते, किमान जीव वाचवणाऱ्या अॅम्ब्युलन्ससाठी इंधन पुरवू शकत नाहीत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाकडे आवश्यक परवानग्या आणि निधी न मिळाल्याने रुग्णसेवा व्यवस्थित देणे अशक्य झाले आहे का? असा प्रश्नही जनतेतून उठू लागला आहे.
प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार यांनी दिली प्रतिक्रिया
या गंभीर परिस्थितीबाबत संपर्क साधला असता महाड तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत बिराजदार म्हणाले— “अॅम्ब्युलन्स इंधन पुरवठा संदर्भात तांत्रिक अडचण आहे. मंत्री गोगावले यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे तातडीचा प्रस्ताव सादर केला आहे. मंजुरी मिळताच समस्या सोडवली जाईल.”
रिक्त पदांचा अडथळा — समस्या आणखी वाढली
तालुका आरोग्य अधिकारी यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर नवीन नियुक्ती करण्यात आली नाही, तर केवळ प्रभारी व्यवस्था सुरू आहे. याशिवाय 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
जिल्हा परिषदेकडून या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यभार आदेशांना विलंब होत असल्याने इंधनपुरवठ्याची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अडकली, अशी माहिती पंचायत समितीच्या कार्यालयीन सूत्रांकडून मिळाली आहे.

