मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा अत्यंत फलदायी, सकारात्मक आणि समाधानकारक ठरल्याचे मोदी सरकार आणि त्यांच्या धार्जिण्या प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर सांगितले जात होते. परराष्ट्र खात्यापासून ते माध्यमांपर्यंत या चर्चेचे कौतुक करण्यात आले. ट्रम्प यांचा “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) हा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होता. मात्र, प्रत्यक्षात घडले भलतेच. ट्रम्प यांनी भारतासाठी टाकलेली तीच प्रशंसेची गुगली मोदी सरकारची विकेट घेणारी ठरली, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
अमेरिकेने भारताच्या निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर तब्बल २७% अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, भारताला त्यांनी १३८ देशांच्या सर्वसामान्य यादीत टाकले आहे, ज्यामुळे व्यापार सवलतींवर मोठा परिणाम होणार आहे. हा फक्त आर्थिक धक्का नसून भारताचा अपमानही आहे, असे गाडगीळ म्हणाले. भारताची अमेरिका निर्यात अंदाजे ₹११,००० कोटी (९५ अब्ज डॉलर) आहे. अमेरिकेतून भारतात आयात मात्र केवळ ₹४,००० कोटींच्या आसपास आहे.
यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून, विशेषतः निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर गंभीर परिणाम होणार आहे.
कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका?
• इंजिनियरिंग क्षेत्र – ₹७,००० कोटींची निर्यात धोक्यात
• दागिने उद्योग – ₹५,००० कोटींची निर्यात प्रभावित
• पेट्रोलियम उत्पादने – ₹५,००० कोटींच्या व्यापारावर परिणाम
या निर्णयामुळे भारताच्या निर्यातक्षम उद्योगांवर विपरीत परिणाम होणार असून, हजारो नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
आयटी क्षेत्र आणि वाहन उद्योगात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर निर्बंध वाढण्याची शक्यता असून, हजारो अभियंत्यांना त्याचा फटका बसू शकतो. वाहन उद्योगातही रोजगार कपातीचा धोका निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांच्या धोरणावर मोदी सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचेही तारतम्य दाखवले नाही, असा आरोप गाडगीळ यांनी केला आहे. ट्रम्प यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकून गाफील राहिलेल्या मोदी सरकारची गुगलीवर विकेट गेली आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.