मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार गोंधळ उडाला. शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून विरोधक आक्रमक झाले. कृषीमंत्री आणि भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विधानांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडून माफीची मागणी केली. त्यानंतर गोंधळात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
या निर्णयाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि इतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन निषेध नोंदवला. काही काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर ‘मुख्यमंत्री माफी मागा’ अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी वातावरण पेटवले. त्यानंतर अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केले.
विरोधकांचा आरोप आहे की, “सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, उलट विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाते. हे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना सरकारचा पाठींबा आहे का, असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
बारा जिल्ह्यांत सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनाचा उल्लेख करत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला. “शेतकरी आमच्या पैशावर जगतात, असे वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकर यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” याकडे लक्ष वेधत वडेट्टीवार म्हणाले, “सरकारच अशा वक्तव्यांचे समर्थन करत आहे का?”
विरोधकांना सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू दिले जात नाही, उलट आवाज उठवल्यावर निलंबन केले जाते, हे निषेधार्ह आहे, असे म्हणत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, गरज पडल्यास तुरुंगवासही स्विकारू, पण आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.