मुंबई – आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेतील महत्त्वाचा भाग बनलेल्या एसटी महामंडळाच्या सुमारे ५२०० बसेससाठी नेमण्यात आलेल्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही व्यवस्था त्यांनी स्वखर्चाने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सरनाईक यांनी मंगळवारी ही घोषणा करताना सांगितले, “गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी महामंडळ आणि त्याचे कर्मचारी वारकऱ्यांची सेवा निष्ठेने करत आले आहेत. उष्णता, पाऊस, वारा या कुठल्याही अडचणींचा विचार न करता ते आपले कर्तव्य पार पाडतात. या सेवेला मान देत मी स्वतःच्या खर्चाने ५, ६ आणि ७ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची मोफत व्यवस्था करीत आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ देण्यात येतील. माझ्यासाठी ही सेवा म्हणजेच ‘विठुरायाची सेवा’ आहे. हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा मी संकल्प केला आहे.”
या कालावधीत पंढरपूर येथील चंद्रभागा, भीमा, विठ्ठल आणि पांडुरंग या चार बसस्थानकांवर सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेणार असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.