मुंबई
शाळेतील विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करावा, असं आवाहन केलं आहे. रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या प्रत्येकाच्या झोपेच्या पद्धतीत बदल झाला आहे. विशेषत: लहान मुले अर्ध्या रात्रीनंतर झोपतात. मात्र शाळेत जाण्यासाठी त्यांनी सकाळी लवकर उठावे लागते. ज्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या पार्श्वभूमीवर शाळा आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी. याशिवाय पुस्तकांशिवाय शाळा, ई-वर्ग यात वाढ करावी आणि शाळांना गुणवत्तेनुसार दर्जा देण्याबरोबरच विद्यार्थी वर्गावरील शिक्षणाचा भार कमी करण्याचे आवाहन केले आहे.
अनेक नव्या उपक्रमांची सुरुवात
राजभवनमधील शाळा व शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमाच्य उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या अपुऱ्या झोपेचा मुद्दा मांडला. बैस याबद्दल बोलत होते त्यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा आणि गिरीश महाजन यांच्या व्यतिरिक्त शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव रणजीत सिंह दयोल देखील उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे माझी शाळा, सुंदर शाळा, शनिवारी गोष्ट सांगण्याचा दिवस, वाचण्याचा आनंद सारख्या नव्या उपक्रमांची सुरुवात केली.
लायब्ररी दत्तक घेण्याची गरज
राज्यात शेकडो सार्वजनिक लायब्ररी आहेत. मात्र अधिकतर जुन्या आहेत. यासाठी त्यांचं पुनरुज्जीव करणे आणि परिसरात कम्युटर आणि इंटरनेट उपलब्ध करून दत्तक लायब्ररी योजना सुरू करण्याची आवश्यकता राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली.