X : @NalawadeAnant
मुंबई – महायुती सरकार एसआयटी सरकार (SIT) असून कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची (Mahayuti government) एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्सच आहे, अशा खरमरीत शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र डागले. त्याचवेळी बदलापूर प्रकरणात (Badlapur incident) एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त सवाल करत या प्रकरणी सरकारने उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने या नियुक्तीवरही वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला.
बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली असून या वकिलाने निवडणूक लढविली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.
सरकार म्हणते विरोधक राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला लाज वाटत नाही का सरकार म्हणून? कलकत्ता इथे अत्याचाराच्या (Kolkata incident) घटना झाल्यावर भाजप (BJP) आंदोलन करते तेव्हा राजकारण नसते का?आम्ही आंदोलन केले की राजकारण होते का? असे खडेबोलही वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले. मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) जिल्ह्यात अशा घटना घडत असून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ५७% टक्के गुन्ह्यात वाढ झाली असून मुख्यमंत्र्यांचेही त्याकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड (Congress MP Varsha Gaikwad), आ. अस्लम शेख (MLA Aslam Shaikh), काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant), काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.