मुंबई – मुंबई आणि महाराष्ट्रात एच.एम.पी. व्हायरसविषयी बेसावध राहणे धोकादायक ठरू शकते, असे मत माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हजारो प्रवासी दररोज विमान मार्गे मुंबई आणि पुण्यात येत असतात. दिल्लीमार्गेही मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवासी भारतात दाखल होतात. त्यामुळे कोणत्याही मार्गाने संक्रमित व्यक्ती आल्यास या व्हायरसचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो.
डॉ. सावंत यांनी सुचवले की, विशेषतः हवाई आणि जलवाहतूक मार्गाने आलेल्या प्रवाशांची तातडीने तपासणी केली जावी. तसेच, या प्रवाशांना काही लक्षणे दिसतात का, याची दखल ८ ते १० दिवसांच्या इनक्युबेशन कालावधीत घ्यावी. चिकुनगुनिया महाराष्ट्रात आधीच आहे, त्यात एच.एम.पी. व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यास आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडू शकतो.
तथापि, हा व्हायरस २००१ पासून अस्तित्वात असला तरी तो सध्या निष्क्रिय आहे. मात्र, भविष्यात या व्हायरसचा उद्रेक झाल्यास मुंबईसारख्या प्रवासी केंद्रांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तत्काळ उपाययोजना:
• आंतरराष्ट्रीय विमानतळांवर त्वरित तपासणी केंद्रे (टेस्टिंग फॅसिलिटी) स्थापन करावीत.
• थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करावी आणि प्रवाशांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
• जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वे वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवावीत.
ड्रग्ज आणि उपचार:
• कोविडप्रमाणे या व्हायरसवर कोणतीही स्पेसिफिक औषधे उपलब्ध नाहीत, त्यामुळे लक्षणांवर आधारित उपचार करावे लागतील.
• आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहून या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
सतर्कता वाढवावी:
हॉगकाँग आणि शांघायसारख्या प्रभावित भागांतून मागील १५ दिवसांत आलेल्या प्रवाशांचे ट्रॅकिंग आणि टेस्टिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत रूग्ण आढळल्यास राज्यातही संसर्ग होण्याची शक्यता आहे.
डॉ. दीपक सावंत यांनी राज्य सरकारकडे या मागणीसाठी विशेष निवेदन दिले आहे.