प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत रायगड जिल्ह्याचा समावेश
महाड : मागील तीन आठवड्यांत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीसह सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मदतीसाठी असलेले सर्व निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना तातडीने सहाय्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी केली.
महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्याचा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्राद्वारे या योजनेत रायगड जिल्ह्याचा समावेश झाल्याची माहिती मिळाली आहे.
महाडच्या पीजी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सौ. स्नेहल जगताप, प्रदेश सरचिटणीस नानासाहेब जगताप, प्रवक्ते धनंजय देशमुख, चंद्रकांत जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अपेक्षा कारेकर, महाड शहराध्यक्ष राकेश शहा, तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तटकरे म्हणाले की, रायगड जिल्हा हा पूर्वी “भाताचे कोठार” म्हणून ओळखला जायचा. औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र या योजनेतून शेतकऱ्यांना नेहमीच्या दोन पिकांबरोबरच अतिरिक्त पिके घेण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावरही या योजनेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना पुढील सहा वर्षांसाठी राबवली जाणार असून, राज्यातील गोदामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“पूर व अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने निकष बाजूला ठेवून तातडीने मदत द्यावी,” असे आवाहन तटकरे यांनी पक्षाच्या वतीने केले.
यापूर्वी पोलादपूर येथे झालेल्या विकासात्मक आढावा बैठकीत नागरिकांनी विविध विभागांच्या कामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. त्याबाबत स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.