मुंबई: हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच उबाठा गटाने महापालिका निवडणुकांमध्ये मराठी कार्ड वापरले. मात्र मुंबई वगळता राज्यातील २६ महापालिकांमध्ये मराठी मतदारांनी उबाठाला पूर्णपणे नाकारले, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत उबाठाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मुंबईकरांनी दिला आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, असा ठाम दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, नगर परिषद, नगर पंचायती आणि २९ महानगरपालिकांमध्ये उबाठाचे अस्तित्व संपले आहे. मुंबईबाहेर नाशिक, परभणी आणि चंद्रपूरमध्ये उबाठाचे काही नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र इतर महापालिकांमध्ये उबाठाला खातेही उघडता आले नाही.
याउलट शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार झाला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ३९९ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना दुसरा मोठा पक्ष ठरली आहे. शिवसेनेचे तीन महापौर होतील, तर उबाठाचा एकही महापौर होणार नाही. उबाठाचे १५५ नगरसेवक निवडून आले असून तो आता पाचव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.
या आकडेवारीवरून खरी शिवसेना कोणाची यावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस मुस्लिम मतांवर निवडून आली – निरुपम
निरुपम म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी १४ मुस्लिम समाजाचे आहेत. उर्वरित १० नगरसेवक मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून आले आहेत. मुस्लिम मतदारांच्या जीवावरच काँग्रेसला यश मिळाले, अशी टीका त्यांनी केली.
बिहार भवनाला विरोध म्हणजे ढोंगीपणा
बिहार सरकारने नवी मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना महाराष्ट्र आणि मुंबईतील मतदारांनी नाकारले आहे, तेच आता बिहार भवनाला विरोध करत आहेत, हे मूर्खपणाचे लक्षण असल्याची टीका निरुपम यांनी केली.
ते म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मकथेत ठाकरे कुटुंब मगध प्रदेशातून आले असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे ठाकरेंनी बिहार भवनाला विरोध करणे म्हणजे ढोंगीपणा आहे. बिहार आणि महाराष्ट्राचे जुने ऐतिहासिक नाते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘एमआयएम’चा उदय लोकशाहीसाठी धोकादायक
निरुपम म्हणाले की, मुस्लिम मतांच्या धुव्रीकरणामुळे राज्यातील महानगरपालिकांमध्ये ‘एमआयएम’ पक्षाचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. ‘एमआयएम’चा उदय लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीका त्यांनी केली.
मुंब्र्यात ‘एमआयएम’च्या नगरसेवकांकडून चिथावणीखोर भाषणे केली जात आहेत. नागपूरमध्ये दंगलीतील आरोपीची पत्नी नगरसेवक झाली आहे. मालेगाव शहर दंगल आणि बॉम्बस्फोटातील आरोपींना आश्रय देणारे शहर म्हणून ओळखले जाते. मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीला बहुमत मिळाले आहे.
मालेगावमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. भारतातील दहशतवादी संघटनांचे मालेगावशी कनेक्शन आहे का, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

