पुणे : हिंजवडीची ओळख आयटी क्षेत्रामुळे केवळ राज्य किंवा देशापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुळे यांनी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात राजीव गांधी आयटी पार्क व इतर भागांना भेट देत रस्त्यांची पाहणी केली. या वेळी फेज-१ ते माण रस्ता, मेट्रो कारशेड रस्ता, मेगापोलीस रस्ता, डोहेलर कंपनी रस्ता, मारुंजी टी-जंक्शनसह विविध रस्त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सुळे म्हणाल्या, “या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून काही मंजूर रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. पावसाचे पाणी साचते कारण नैसर्गिक जलस्रोत बुजवण्यात आले आहेत. वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नव्या प्रकल्पांमुळे ध्वनी प्रदूषण आणि इतर नियमभंग सुरू असून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची समस्याही गंभीर आहे.”
या समस्या सोडवण्यासाठी लवकरच पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी यांच्यासह संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना ठरवण्यात येतील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुळे म्हणाल्या, “मी केवळ विरोधक म्हणून टीका करत नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात गुन्हेगारी वाढते आहे. हे चिंताजनक आहे.”
शिवसेनाविषयी बोलताना सुळे म्हणाल्या, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान देशाच्या इतिहासात सन्मानाने नोंदवले जाईल. केवळ ‘ठाकरे’ आडनाव असलेल्याचं नव्हे, तर प्रत्येक निष्ठावान शिवसैनिकाचं त्या संघटनेत स्थान आहे. कोणीही तो इतिहास मिटवू शकत नाही.”
हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबमध्ये मूलभूत सुविधा कोलमडत असतील तर ते राज्य शासनासाठी आणि प्रशासनासाठी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहे, असे मत सुळे यांनी स्पष्ट शब्दांत मांडले.