Twitter @therajkaran
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया (hip replacement surgery) करण्यात आली. ११ वर्षीय मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्याची घटना भारतातील पहिलीच असल्याचा दावा केईएम रुग्णालय (KEM Hospital) प्रशासनाकडून करण्यात आला आहे. बिहार येथील फरझाना खातून या मुलीला जन्मापासूनच उजव्या पायात बाक असल्याने ती एका बाजूला वाकली होती. शिवाय तिच्या गुडघ्यातील वाटी सरकल्याने तिच्या सांध्याची झीज देखील झाली होती. सांध्याच्या या आजाराला क्होनड्रोलायसिस असे म्हणत असल्याचे अस्थिव्यंग शल्यक्रिया (Orthopedic surgery) विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले. मात्र या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने सध्या तरी ती वॉकर घेऊन चालत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या मुलींवर तिच्याच गावी क्षयावर उपचार सुरु होते. आगामी उपचारासाठी तिला केईएम रुग्णालयात जाण्याचे सुचविण्यात आले. त्यामुळे मुलीसह नातेवाईक मुंबईत दाखल झाले. आजाराच्या निदानाला सुरुवात झाल्यावर एमआरआय मध्ये क्होनड्रोलायसिसचे (Chondrolysis) देखील निदान झाले. शस्त्रक्रियेपूर्वी तिच्या पायाला वजन बांधण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेने काही फरक न पडल्याने डॉक्टरांनी तिच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
रुग्णालयाच्या बहुउद्देशीय टीमने अत्यंत कुशलतेने ६ नोव्हेंबर या दिवशी मुलीवर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. या मुलीवर किमान २० ते २५ वर्षे टिकेल असे सिरामिक अँड सिरामिकचा सांधा बसवण्यात आला आहे. ती लहान असल्याने ही शस्त्रक्रिया तिच्यासाठी महत्त्वाची आहे. आता ही मुलगी वॉकरसह चालतेय, अजून ६० ते ७० टक्के विकृती आणि प्रकृती बरे होणे बाकी असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग शल्यक्रियाविभाग युनिट प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. एस.एस. मोहंती यांनी सांगितले.
या युनिटच्या अनेक डॉक्टरांनी केससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विभागाचे डॉ. तुषार कदम, डॉ. रुद्र प्रभू, डॉ. प्रणव केसवानी, डॉ. गगनदीप चुघ, भूलतज्ज्ञ डॉ. दिपा काणे या टिमने आपले कौशल्य दाखवले, तसेच, अस्थिव्यंग शल्यक्रिया विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. मोहन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले.
शस्त्रक्रियेनंतर हिला फिजिओथेरपीची (Physiotherapy) गरज भासल्याने डॉ. स्वाती परांजपे आणि डॉ. मुस्कान लोकवाणी हे तिला मदत करत आहेत. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी या प्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत केली. या शस्त्रक्रियेला खासगी १० लाखांहून अधिक खर्च येतो. मात्र, केईएम रुग्णालयात फक्त सिरामिक सांध्याचा खर्च रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्याने अत्यंत कमी खर्चात ही शस्त्रक्रिया झाल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले.