नागपूर: छत्रापुर गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोठ्या कंटेनरने महामार्गावर असलेल्या २५ जनावरांना चिरडले. या भीषण अपघातात सर्व जनावरे जागीच मृत्युमुखी पडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे अपघात घडले आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही भरपाई मिळाली नाही आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात आली नाही. याच निष्क्रियतेचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत रास्तारोको आंदोलन सुरू केलं.
या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. आशीषराव देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. घटनास्थळीच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, छत्रापुर परिसरात दीर्घकालीन मागणी असलेला उड्डाणपूल मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली.
या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत, योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदार देशमुख यांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत सांगितले, “हा पूल पूर्ण झाल्यानंतर अशा हृदयद्रावक घटना पुन्हा घडणार नाहीत.”
त्यांच्या विश्वासदायक आश्वासनामुळे ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले. मात्र, “ही लढाई केवळ एका अपघातापुरती मर्यादित नाही, तर छत्रापुरवासीयांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे – आणि ती लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे,” असा ठाम निर्धार आमदार आशीषराव देशमुख यांनी व्यक्त केला.