वाराणसी (उत्तर प्रदेश) : “वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे” — संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेल्या या भक्तिभावनेचा अनुभव आज मला येथे येऊन प्रत्यक्ष मिळाला, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते श्री धर्मसंघ मणी मंदिर, दुर्गाकुंड येथे उभारण्यात आलेल्या शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
यावेळी उत्तर प्रदेशचे आयुष विज्ञान मंत्री दयाशंकर मिश्रा, शास्त्र संग्रहालयाचे संचालक रामानंद तिवारी, पद्मश्री आचार्य गणेश्वर शास्त्रीजी, उपेंद्र त्रिपाठी, धर्मसंसदेचे महामंत्री आचार्य जगजित पांडे, तसेच भजन बोबडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पुरीच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आणि त्याच दिवशी या केंद्राचे उद्घाटन होणे, ही एक अद्वितीय आणि पवित्र संयोगाची अनुभूती आहे. स्वामी करपात्री महाराजांचा मणी मंदिर आश्रम म्हणजे सनातन हिंदू संस्कृतीचे एक जिवंत केंद्र आहे, जिथे अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संगम घडतो.”
शिंदे यांनी नमूद केले की, हे संग्रहालय केवळ सांस्कृतिक वारसाचा जतन करणारे ठिकाण नाही, तर नवीन पिढीपर्यंत वैदिक परंपरा, शास्त्र, योग, पर्यावरण आणि औषधी वनस्पती यांचे ज्ञान पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
या केंद्रात लवकरच वेदशास्त्र, वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती विज्ञान, वास्तुशास्त्र आणि विज्ञानाशी निगडित विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय, थ्रीडी स्वरूपातील शास्त्र आधारित संग्रहालयही इथे उभारले जाईल, अशी माहिती देण्यात आली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये वारंवार प्राचीन वेदांचा उल्लेख करतात, त्यामुळे जगभरात वेदांबद्दल कुतूहल वाढले आहे. हे केंद्र भविष्यात जगभरातील अभ्यासकांसाठी वेद आणि शास्त्रोक्त विद्यांचे हक्काचे अध्ययन केंद्र ठरेल, अशी अपेक्षा आहे,” असेही शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आचार्य गणेश्वर शास्त्रीजी व संचालक रामानंद तिवारी यांच्याकडून या केंद्राची माहिती जाणून घेतली. केंद्रात जतन करण्यात आलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि डिजिटल स्वरूपातील साहित्याचीही त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पाहणी केली.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने करण्यात आले असून, वैदिक परंपरा, विज्ञान आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेले हे केंद्र भविष्यात एक आदर्श अभ्यासपीठ ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.