महाड – महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले हुतात्मा स्मारक आज दारू पिणारे, बेवारस लोक आणि बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनले आहे. सायंकाळच्या वेळी दारुड्यांनी स्मारकाच्या भिंतीला टेकून दारू प्यायची सवय लावली असून, सहा आसनी रिक्षा, मोटरसायकली आणि नगरपालिका कचरा हातगाड्यांनी परिसर वेढलेला असतो. नगरपालिकेच्या मुख्यालयालगत असलेल्या या स्मारकाची दयनीय अवस्था पाहून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि हुतात्म्यांच्या स्मृतीप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचा स्पष्ट प्रत्यय येतो.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केलेल्या नारायण उर्फ वसंत बाळकृष्ण दाते, कमलाकर विठ्ठल दांडेकर, अर्जुन कानू भोई उर्फ कडू, नथू दौलत टेकवले आणि विठ्ठल बिरवाडकर या महाडच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. परंतु आज हेच स्मारक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सन्मानाचे प्रतीक न राहता उपेक्षेचा बळी ठरले आहे.
स्मारक परिसरात पाण्याची साठवणूक, दुर्गंधी, अस्वच्छता, बेवारस व्यक्तींची झोपण्याची जागा आणि दारू प्यायचा अड्डा असे चित्र रोज पाहायला मिळते. महाड नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्मारकाच्या सन्मानाचा घात होत असून, स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांकडून यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.