महाराष्ट्र ताज्या बातम्या

लाज शिल्लक असेल तर शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा – विजय वडेट्टीवार पक्षनेत्यांची विधानसभेत मागणी

X: @NalavadeAnant

नागपूर: दुष्काळ, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत असताना त्यांना पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावे, वीज बील माफ करावे, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, पिकविम्याची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी अल्पकालीन चर्चेदरम्यान सभागृहात केली.

वडेट्टीवार म्हणाले, सरकारने ट्रीगर एकमध्ये १९४ तालुके असताना केवळ ४० तालुकेच दुष्काळी घोषीत केले. यावेळी सरकारने केवळ एमआर-सॅक व महा-मदत ही संगणक प्रणालीचा आधार घेतला. पण शेतकऱ्यांच्या अश्रू पाहिले नाहीत. शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्यासाठी काढले तरी या सरकारला लाज वाटत नाही. त्यामूळे त्यांना शासनाने सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रूपये आणि बागायती खालील क्षेत्राकरिता प्रति हेक्टरी किमान १ लाख रूपये तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली.

ते म्हणाले, खरे तर २४ ऑगस्टलाच आम्ही दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले. पण सरकारला जाग आली नाही. कर्नाटकच्या धर्तीवर सरकारने आधीच दुष्काळ जाहीर केला असता तर शेतकऱ्यांचे भले झाले असते, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. देशातील जवळपास ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. राज्यात सुमारे ३ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु सरकार गंभीर नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यापैकी मराठवाड्यात दररोज दोन ते तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. संकटात शेतकरी होरपळला असताना तुम्ही नियम, निकष, जीआरची भाषा करता. जीआर, नियम, निकष शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करत असतील तर बदलले पाहिजेत, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

पीकविमा कंपन्यांचे मुजोर प्रतिनिधी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. अपमानास्पद वागणूक देत आहेत. या कंपन्या दोन, चार रूपये अशी मदत देत आहेत. या कंपन्यांची मुजोरी थांबविली पाहिजे. आजपर्यंत सरकारने तब्बल ८ हजार कोटी रूपये सरकारने या कंपन्यांना दिले. यातून कंपन्यांचा फायदाच झाला. यातला वाटा सरकारला मिळत असल्याची चर्चा असताना सरकार या कंपन्यांचे लाड का पुरवतंय, असा खडा सवालही वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला.

संत्रा, तांदूळ, कांदा निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. संत्रा उत्पादक शेतकरी निर्यादबंदी मुळे हवालदिल झाला असून तांदूळ निर्यादबंदीमुळे राईस मिल्स उद्योग अडचणीत आले आहेत. रोजगारावर टाच आली आहे. या विदर्भातील उद्योगांचे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्यात बंदी देखील उठवली पाहिजे. बैल गेला आणि झोपा केला, अशी या सरकारची परिस्थीती आहे.

सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करावे, अशा बोचऱ्या शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे कानही टोचले. आस्मानी संकटाबरोबरच तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. तरी देखील तुम्ही उजळ माथ्याने राज्यात फिरताय. त्यामूळे आता उरली सुरली थोडी जरी लाज शिल्लक असेल तर सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस मदत जाहीर करावी. कांदा, धान, संत्रा यांची निर्यात बंदी, कापूस, सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी, इथेनॉलवर बंदी, दुधाचे दर पाडणे, बोगस बियाण्याकडे दुर्लक्ष करणे, अशा शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागला. कारण शेतकरी आत्महत्येचं पाप तुमच्या माथी आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोलही केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात