मुंबई: विधानपरिषदेत दिशा सालियन प्रकरणावर चर्चा सुरू असताना भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करत, या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास करण्याचा आग्रह धरला. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
विरोधकांची दिशाभूल आणि वैयक्तिक टीका
या मुद्यावर विरोधी पक्ष, विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना हा विषय असह्य झाल्याने त्यांनी सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरण उकरून काढत, चित्रा वाघ यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न केला.
चित्रा वाघ यांचा सडेतोड प्रत्युत्तर : उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोडला क्लीन चिट दिली!
अनिल परब यांच्या टिकेला सभागृहात रणरागिणीच्या रूपात उत्तर देताना आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, “जेव्हा स्त्रियांना मुद्द्याला धरून उत्तर देता येत नाही, तेव्हा पुरुष त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करतात. हीच प्रचिती आज मंदिरासम सभागृहात आली.”
तसेच, अनिल परब यांना थेट आव्हान देत त्यांनी स्पष्ट केले की,
“संजय राठोड यांना क्लीन चिट देणारे तात्कालीन मुख्यमंत्री तुमचे उद्धव ठाकरे होते. मी पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून झुंज दिली, पण तुमच्या उद्धव साहेबांनीच राठोडला वाचवले. हिंमत असेल तर चला, आपण उद्धव ठाकरे यांना जाब विचारायला जाऊ!”
दिशा सालियन प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी
• दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानपरिषदेत याचे पडसाद उमटले.
• शिंदे गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणाचा पुनर्तपास करण्याची मागणी केली.
• चित्रा वाघ यांनी या मागणीला पाठिंबा देत एसआयटीचा रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा आग्रह धरला.
• यावर विरोधकांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांचे महिलांविषयी दुटप्पी धोरण उघड
चित्रा वाघ यांनी विरोधी पक्षाच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका करत सांगितले की, “सभागृहात २० मार्च रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता, विरोधकांनी घेतलेली भूमिका महिला विरोधी होती. महिला आमदारांचा अपमान करून राजकीय बचाव करण्याचा विरोधकांचा हा प्रकार महाराष्ट्राने पाहिला आहे.”
सभागृहात महिला आमदारांशी जर अशी वागणूक असेल, तर समाजात काय?
गेल्या काही दिवसांत अधिवेशनात विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून महिलांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितले. संवेदनशील विषयांवर चर्चेऐवजी विरोधक मुद्द्याचे गांभीर्य टाळत गोंधळ घालत आहेत.
“सभागृहात महिला आमदारांशी जर अशी वागणूक होत असेल, तर समाजात या लोकांना महिलांबद्दल किती आदर असेल?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांचा खोटारडेपणा उघड केला.