X: @therajkaran
पाकिस्तानात सुमारे अडीच कोटी मुले शाळेत जात नाहीत. ही सगळी मुले गरीब घरातील आहेत. त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून ते कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत नाहीत. शाळेत न जाणाऱ्या मुलांची इतकी प्रचंड संख्या पाकिस्तान पुढील डोकेदुखी ठरू शकते.
कधीही शाळेचे तोंडदेखील न पाहिलेली ही मुले बहुतांश करून बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पखतुंख्वा या प्रांतांतील आहेत. हे मुले शाळेत जात नाहीत, आई-वडिलांना पडेल त्या कामात मदत करतात त्यामुळे गरिबी कायम राहते. ही तर एक समस्या आहेच. त्याच्या जोडीलाच समाज विघातक कृत्यांसाठी किंवा दहशतवादी कृत्यांसाठी अशा मुलांचा भविष्यात वापर होण्याची शक्यता जास्त आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यातील अजमल कसाब हा एक दहशतवादी असाच अशिक्षित राहिलेला, गरीब घरातून आलेला होता. ही अशिक्षित आणि गरीब मुले थोड्याशा पैशांसाठी कोणत्याही प्रकारचे आणि कोणत्याही थराचे कृत्य करायला मागेपुढे पाहत नाहीत.
भारताचा अविभाज्य भाग असलेले दोन भू-भाग गिलगिट-बाल्टीस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानने घुसखोरी करून आपल्या ताब्यात ठेवले खरे, मात्र तेथील मुलांच्या शिक्षणाची स्थिती अधिकच भयावह आहे. ही मुले दहशतवाद्यांच्या तावडीत आयतीच सापडतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ही समस्या हेरली आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी देशभरात जिथे-जिथे आवश्यकता वाटेल तिथे-तिथे दानिश शाळा हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. गरीब मुलांच्या विनामूल्य शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी दानिश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहाबाज शरीफ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा उपक्रम सुरू केला होता. त्याला बऱ्यापैकी यशदेखील मिळाले होते. आता पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दानिश शाळा हा उपक्रम देशभरात सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
पाकिस्तानात शैक्षणिक आणीबाणी जाहीर करावी इतकी गंभीर आणि भयंकर परिस्थिती आहे, असे शहाबाज शरीफ यांनी मान्य केले आहे. शिक्षण क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे याची जाणीवदेखील त्यांना आहे. परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. त्यात त्यांना कितपत यश मिळते, पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक आणि दहशतवादाचे वातावरण गरीब मुलांना शिक्षण घेण्यास मदत करते की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल.