मुंबई : उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते, परंतू देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर कडाडून टीका केली जात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे राज्यघटना बदलण्याबाबत वक्तव्य करीत असताना दिसत आहे. ‘भाजपच्या जे पोटात तेच ओठात! भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्राच्या नावाखाली “वन नेशन वन इलेक्शनची” घोषणा ही सरळसरळ भारतीय संविधान बदलण्याचा मनोदय आहे.’, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडेंसह भाजपवर टीका केली आहे.
यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान बदलू शकणार नाहीत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे बाबासाहेबांच्या जयंतीदिनी संविधान बदण्याच्या अर्थाचे विधान करतात, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंच्या विधानाचा निषेध केला. आव्हाड पुढे म्हणाले, आचार्य अत्रेंच्या भाषेत सांगायचं तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीची सर पुढच्या दहा हजार वर्षातही कुणाला येणार नाही. त्यामु़ळे मोदींनी मतदारांना भुलवण्यासाठी नको ती विधानं करू नये.
मोदींचा इतिहास काढला तर ते जे बोलतात त्याच्या कायम विपरित करतात. त्यामुळे लोकांनी यावरही विश्वास ठेवू नये. संविधान न बदलण्याची भाषा मोदीजी इतक्या छातीठोकपणे करत असतील तर त्यांनी संविधान बदलण्याची जाहीर वक्तव्ये करणा-या भाजपमधील नेत्यांवर सर्वप्रथम कारवाई करावी आणि नंतर विरोधकांवर टीका करावी.
ही दिखावेगिरी आता चालणार नाही. ‘मोदी लाट’, ‘चारशे पार’ या फुगवलेल्या वल्गना खूप झाल्या. आणि इतिहासाची मोडतोड, महापुरूषांबद्दल अपमानास्पद विधाने तर करूच नका. कारण यावेळी जनता तुम्हाला तुमची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.