X: @therajkaran
गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढले आहेत. पहिला हल्ला ग्वादर बंदर (Gwadar port) प्राधिकरणाच्या परिसरात झाला आणि दुसरा पीएनएस सिद्दीक या नौदल तळावर (PNS Siddique naval airbase). या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे बलुचिस्तान (Balochistan) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) संघटना. ग्वादर हे बंदर बलुचिस्तान प्रांतात आहे. पीएनएस सिद्दिक हा नौदलाचा तळदेखील बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत येथे आहे.
चीन आणि पाकिस्तानमधील संबंध बळकट करणारा चायना – पाकिस्तान इकॉनोमिक कॉरिडॉर (China – Pakistan Economic Corridor – CPEC) पूर्ण करायचा असेल तर ग्वादर बंदर अतिशय महत्त्वाचे ठरते. या बंदराचा विकास चीन करत आहे. आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी या बंदराचा भविष्यात उपयोग करण्याची चीनची योजना आहे. पीएनएस सिद्दीक हा पाकिस्तानचा दुसरा सर्वांत मोठा नौदल तळ आहे. या तळावर लढाऊ विमानेदेखील तैनात आहेत. तेथे चिनी उपकरणे आणि चिनी नागरिकांचा वावरदेखील असतो. पाकिस्तानात चारच सक्रिय नौदल तळ आहेत, हे विशेष.
ग्वादर आणि तुर्बत या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे माजीद ब्रिगेड (Majeed Brigade) या संघटनेचा या हल्ल्यांमधील सक्रिय सहभाग. माजीद ब्रिगेडच्या सदस्यांनी हे हल्ले घडवून आणले असा सबळ पुरावा उपलब्ध आहे. माजीद ब्रिगेड हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे आत्मघातकी दल (suicide squad) आहे. त्याचे सदस्य स्वतःला स्फोटांमध्ये उडवून देतात आणि हल्ला घडवून आणतात.
माजीद लांगोव (सीनियर) आणि माजीद लांगोव (ज्युनिअर) या दोन बंधूंच्या स्मरणार्थ हे आत्मघातकी दल उभारण्यात आले आहे. यातील मोठा भाऊ 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फीकार भुट्टो (Zulfikar Bhutto) यांच्या हत्येचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांकडून मारला गेला, तर धाकटा भाऊ 2010 मध्ये आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांपासून वाचवताना मृत्युमुखी पडला. तेव्हापासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक या बंधूंना आपला आदर्श मानतात. माजीद ब्रिगेडची स्थापना 2010 मध्ये झाली. त्याच्या पुढील वर्षी त्यांनी आपला पहिला हल्ला घडवून आणला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात कारवाईची मागणी करणारा नेता शफिक मेंगल हा त्यांचे लक्ष्य होता. तो या हल्ल्यात बचावला. मात्र, इतर 13 जण ठार झाले. त्यानंतर जवळपास सात वर्षे आर्थिक चणचणीमुळे माजीद ब्रिगेड सुप्तावस्थेत राहिले.
माजीद ब्रिगेडच्या दृष्टीने 2018 ते 2020 ही वर्षे खूप घडामोडींची होती. त्यांनी एका पाठोपाठ एक चार हल्ले घडवून आणले. पहिला हल्ला चिनी अभियंत्यांवर होता. दुसरा कराचीमधील चीन वकिलातीवर होता. तिसरा ग्वादरच्या एका हॉटेलवर आणि चौथा पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर (Pakistan Stock Exchange) होता.
माजीद ब्रिगेडमध्ये शंभर ते दीडशे सदस्य असावेत, असा अंदाज आहे. त्यात महिलादेखील आहेत. हे सगळे सदस्य शस्त्रास्त्रे आणि स्फोटके हाताळण्यात आणि चालवण्यात पारंगत आहेत. इतर संघटनांच्या आत्मघातकी दलांप्रमाणे माजीद ब्रिगेडच्या सदस्यांना कोंडून ठेवण्यात येत नाही. ते समाजात तसेच आपल्या नातेवाइकांमध्ये मिसळण्यास मोकळे असतात. आपले लक्ष्य निवडण्याचा अधिकारदेखील त्यांना आहे. ठरवून दिलेले लक्ष्य त्यांना पटले नसेल तर ते बदलण्याचा किंवा त्या मोहिमेतून स्वतःला दूर ठेवण्याचा अधिकारदेखील त्यांना आहे.
जवळपास चार वर्षांनी माजीद ब्रिगेडने आपले अस्तित्व पुन्हा दाखवून दिले आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि नौदल कदाचित त्यांचा मुकाबला करतीलही. मात्र, बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यलढा माजीद ब्रिगेडने जगाच्या नकाशावर तर आणला आहेच शिवाय त्याला बळही दिले आहे हे मात्र नक्की.