मुबंई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar )लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत .अखेर आज त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group)त्यांच्या कोठ्यातून परभणीतून (Parbhani) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे .आता जानकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव रिंगणात उतरणार आहेत .
लोकसभेसाठी सुनील तटकरे यांनी महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याची माहिती समोर आली आहे .रायगडमधून सुनील तटकरे हे रिंगणात असणार आहेत. बारामती मधून सुनेत्रा पवारांची उमेदवार निश्चित आहे, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असणार आहे. यावर सुनील तटकारे म्हणाले ,कि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, व राष्ट्रवादीच्या वतीने एकत्र येत परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आम्ही पक्षातील सर्वांनी एकत्र येत निर्णय घेतला व परभणीची जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून ‘रासप’ला देण्यात आली. या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून महादेव जानकर हे असतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
दरम्यान लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप व त्यासंदर्भातील काही घोषणा देखील झाल्या आहेत. भाजपने 24 जागावर उमेदवार घोषणा केली. शिवसेनेच्या वतीने देखील अधिकृत 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने देखील सात ते आठ जागा मागितलेल्या आहेत. परंतु आज प्रामुख्याने आम्ही मागितलेल्या जागांमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ होता. त्याठिकाणी आम्ही रासपला ही जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले .याआधी महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर हे लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र ऐनवेळी जानकर महायुतीसोबत गेल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. महादेव जानकर यांनी माढ्यातून लढायला हवं होतं असं शरद पवार म्हणाले होते. महायुतीसोबत गेल्यावर जानकर कोणत्या मतदार संघातून लढणार याबाबत अनेक चर्चा होत होत्या. आता परभणी मतदार संघातून जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.