मुंबई- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत आज अखेर घोषित झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानं हा संघर्ष येत्या काळात अधिक जोमदार होण्याची शक्यता आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहणार आहेत.
आनंदाचा क्षण, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया
उमेदवारी घोषित झाल्यानंतर बारामतीत असलेल्या सुनेत्रा पवार यांनीयावर आपली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्याबाबत आनंद व्यक्त केलाय. हा आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. अजित पवारांच्या विचाराला बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी साथ द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. या निवडणुकीत निश्चित विजयी होऊ, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवतारेंच्या माघारीनंतर उमेदवारी जाहीर
शिंदेंच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात बंडाची घोषणा केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी शिवतारे यांची समजूत काढण्यात महायुतीला यश आलंय. विजय शिवतारे यांनीही त्यानंतर पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. शिवतारेंच्या माघारीनंतर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे.
शरद पवारांच्या पाच उमेदवारांची घोषणा
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.
१. सुप्रिया सुळे – बारामती
२. अमोल कोल्हे- शिरुर
३. निलेश लंके- नगर
४. भास्करराव भगरे-दिंडोरी
५. अमर काळे- वर्धा
या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. सर्वांचं लक्ष असलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, याचा सस्पेन्स मात्र कायम ठेवलेला आहे.