महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी

१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

मुंबई : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये ‘फार्मर कप’ उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासन आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २०२६-२७ या वर्षात १५ हजार शेतकरी उत्पादक गट स्थापन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, “कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतमालाला योग्य बाजारपेठ, उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. २३ मार्च २०२५ रोजी पाणी फाउंडेशनच्या वार्षिक कार्यक्रमात जाहीर झालेला ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ आता शासनाशी जोडला जात आहे, ज्यामुळे उपक्रमाला व्यापक स्वरूप लाभणार आहे.”

पाणी फाउंडेशनने २०२१ पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप’च्या माध्यमातून ५० हजार शेतकऱ्यांना संघटित केले असून, यापैकी जवळपास अर्धे गट महिला शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. सध्या ४६ तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे अनुभव आले आहेत.

पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान म्हणाले, “राज्य शासनासोबतची भागीदारी आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची संधी देते. ज्ञान, प्रशिक्षण व सामूहिकीकरणाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. ‘फार्मर कप’ला लोकचळवळ बनवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे.”

‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीमध्ये कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे परिमल सिंह, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, सह्याद्री फार्म्सचे सीईओ विलास शिंदे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग, प्रिया खान आदींचा समावेश आहे.

समिती पुढील तीन महिन्यांत आपला पहिला कृती अहवाल सादर करेल. तिच्या कार्यकक्षेत प्रत्येक गावात उपक्रमाचा विस्तार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी कार्ययोजना, गटशेतीला चालना, हवामानाशी सुसंगत शेती पद्धती, रासायनिक खतांचा कमी वापर, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा प्रसार यांचा समावेश असेल.

पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ म्हणाले, “गटशेतीमुळे प्रति एकर लागवड खर्चात २० टक्के बचत आणि नफ्यात १०० टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक शेतकरी या उपक्रमाचा लाभ घेऊन उत्पन्न व उत्पादकता वाढवू शकेल.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात