सदस्य नोंदणी अभियानाच्या प्रदेश सहसंयोजक पदी नरेंद्र पवार यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षातर्फे आगामी काळात संपूर्ण भारतभर सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून त्यामध्ये वसई विरार जिल्ह्यातून किमान 5 लाख सदस्य नोंदणीचे करण्याचे आवाहन भाजपच्या संघटन पर्व 2024 सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रदेश सहसंयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा येथे झालेल्या वसई विरार जिल्ह्याच्या प्राथमिक बैठकीत त्यांनी हे 5 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य निर्धारित केले.
येत्या काही महिन्यांमध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. आधी लोकसभा निवडणुकांतील विजय, त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निर्भेळ यश पाहता येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्षाची अशीच विजयी घोडदौड कायम राहणे आवश्यक असल्याचे मत नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रदेश भाजपतर्फे संघटन पर्व – 2024 या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ होत आहे. या मोहिमेमध्ये भाजपच्या वसई विरार जिल्ह्यातून किमान 5 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठण्याचे आवाहन नरेंद्र पवार यांनी या बैठकीत केले. तर विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत विजयाबद्दल भाजपच्या वसई विरार जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पवार यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पक्षश्रेष्ठींकडून नरेंद्र पवार यांची संघटन पर्व 2024 च्या प्रदेश सह संयोजकपदी नियुक्ती…
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर या दोन विधानसभांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नरेंद्र पवार यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये मोठी भूमिका बजावली. त्याची दखल घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींकडून नरेंद्र पवार यांची संघटन पर्व 2024 या सदस्य नोंदणी मोहिमेच्या प्रदेश सह संयोजकपदी नियुक्ती केली आहे. ज्याअंतर्गत त्यांच्याकडे ठाणे विभागाच्या 9 जिल्ह्यांतील भाजप सदस्य नोंदणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नालासोपारा येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई विरार जिल्ह्याची बैठक संपन्न झाली.
यावेळी नालासोपारा विधानसभा आमदार राजन नाईक, वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे यांच्यासह भाजपा प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी राणीताई द्विवेदी, ठाणे विभाग संघटनमंत्री हेमंतजी म्हात्रे, वसई विरार जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, सरचिटणीस प्रज्ञा पाटील, अभय कक्कड, विश्वास सावंत, जे.पी. सिंह तसेच प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा आघाडी अध्यक्ष सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.