मुंबई: केंद्र सरकारने नुकतीच शेतीमालाच्या हमीभावामध्ये वाढ जाहीर केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या वाढीचे स्वागत करण्यात येते. त्याचवेळी ही लाभ प्रत्येकी शेतकऱ्यांच्या पदरात पडावे अशी अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे.
या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अजित नवले यांनी नमूद केले आहे की, या वाढीला खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा हे वाढलेले दर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बाजारात मिळतात. केवळ कागदोपत्री वाढ जाहीर करून राजकीय श्रेय घेण्याची परंपरा आता थांबायला हवी. दुर्दैवाने, अनेक वेळा सरकार जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांच्या हातात पडतच नाहीत.
उदाहरणार्थ, गेल्या वर्षी सोयाबीनच्या हमीभावात वाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात, मुदतीच्या अटी लावून पुरेशा प्रमाणात खरेदी झाली नाही. हाच अनुभव तुरीसह अनेक पिकांबाबत वारंवार येत आहे.
एकीकडे तुरीच्या आधारभावात वाढ केली जाते, तर दुसरीकडे सरकारच आयात धोरण राबवून बाजारात तुरीचे दर घसरवते. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच होते. सरकारने यापुढे अशा धोरणात्मक विसंगती टाळाव्यात.
हमीभावांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने खालील गोष्टींवर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करताना डॉ अजित नवले यांनी पुढील उपाय सुचवले आहेत. हमीभावाच्या आधारावरच बाजारभाव निश्चित करण्याचे उपाय करावेत, आयात-निर्यात धोरणे शेतकरीहिताच्या अनुषंगाने ठरवावीत, हमीभावापेक्षा जास्त दर देऊन सरकारी खरेदीची हमी दिली पाहिजे
अन्यथा, हमीभावातील वाढ ही केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल. शेतकऱ्याच्या दृष्टीने या घोषणांना काहीच अर्थ उरणार नाही, असे डॉ नवले यांनी म्हटले आहे.