मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला फटकारले……!
मुंबई– ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक करणारा मोठा टँकर ३ तारखेला संध्याकाळी उलटून तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे कमालीचे हाल झाल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत महायुती सरकारला गुरुवारी चांगलेच फटकारले…..! “रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का……?” अशी खरमरीत विचारणा करत, आता यातून सरकार, प्रशासन काही बोध घेणार का……? अशी परखड विचारणाही ठाकरे यांनी सरकारला केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, आता नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. मात्र या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात का, असाही रोखठोक प्रश्न त्यांनी सरकारला विचारला…..
ज्यावेळी गॅसचा टँकर उलटला, त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय-काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का……? अशीही विचारणा करत, स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्यालाही आता २४ वर्षे उलटली. पण या काळात काय-काय आपत्ती येऊ शकतात ना याचा विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. फक्त मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली, असा टोलाही त्यांनी लगावला…..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच, हे सांगतानाच ते होतं—जर टोल घेतला जात असेल, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी प्रवाशांना काय सुविधा देते याबद्दलचं. म्हणूनच कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का……? अशी रोखठोक विचारणाही केली.
परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई–पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेव्हा होईल. पण त्याआधी मुंबई–पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई–पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं—यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय असल्याचा तीव्र संतापही ठाकरे यांनी व्यक्त केला…..
ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला, तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे, अशी मागणी करतानाच सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतात, असा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना मार्मिक चिमटाही काढला….. त्याचवेळी, पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असूनसुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे, याचा सरकारने विचार करावाच, असेही आवाहन राज ठाकरे यांनी शेवटी आपल्या निवेदनात सरकारला केले…..

