Twitter : @vivekbhavsar
मुंबई
जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha) भारतीय जनता पक्षातर्फे सलग दोन वेळा निवडून आलेले ए टी नाना पाटील (Ex MP A T Nana Patil) यांना 2019 च्या निवडणुकीत डावण्यात आलं होते. त्यांच्याऐवजी तरुण चेहरा उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात आले. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि उन्मेश पाटील यांच्यातील विसंवाद बघता उन्मेष पाटील यांचा पत्ता कापून त्यांच्या ऐवजी पुन्हा एकदा माजी खासदार ए टी नाना पाटील यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उन्मेष पाटील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्याआधी ए टी नाना पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील भाजपचे (BJP) नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यामध्ये विसंवाद दिसू लागला आहे. परिणामी उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले जाईल, अशी चर्चा जिल्ह्यामध्ये आहे.
याच राजकीय पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एटी नाना पाटील यांच्यावर तेलंगणा (Telangana assembly elections) राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. चार वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर असलेले ए टी नाना पाटील यांना भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने पुन्हा सक्रिय केल्याने जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. पाटील यांच्याकडे तेलंगणातील दोन जिल्हे आणि तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी मेहबूबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार देखील केला आहे. या उमेदवारांच्या प्रचाराचा फोटो आणि माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली आहे.
एटी नाना पाटील यांचा सक्रिय होणे, राज्यस्तरीय नेतृत्वाकडून त्यांना राजकीय ताकद देणे, या साऱ्याचा अर्थ उन्मेष पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीशी लावला जात आहे. उन्मेष पाटील यांना पुन्हा तिकीट मिळणार नाही, अशीच चर्चा जिल्ह्यामध्ये रंगली आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय नेतृत्व जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या रक्षा खडसे (MP Rakshsa Khadse) आणि जळगावचे उन्मेष पाटील या दोन्ही खासदारांना बदलून त्या ठिकाणी जुने चेहरे किंवा नवीन चेहरे देतील, अशी चर्चा आहे.