मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडवणाऱ्या घटनांचा गुरुवार हा दिवस ठरला. या घडामोडींमुळे विशेषतः काँग्रेससह महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या गोरंट्याल यांची खरी ओळख मात्र त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिलेल्या “पन्नास खोके, एकदम ओक्के!” या घोषणेमुळे झाली होती.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत, “मातीशी जोडलेला नेता भाजपात आल्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे स्पष्टपणे नमूद केले.
गोरंट्याल यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या जालन्यातील बालेकिल्ल्याला मोठा तडा गेला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील याच वेळी भाजपात प्रवेश घेतल्यामुळे जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलल्याचे चित्र आहे. “आता जालना महापालिकेवर भाजपाचा पहिलाच महापौर विराजमान होणार,” अशी ठाम घोषणा गोरंट्याल यांनी केली.
गोरंट्याल यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले, “मी कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासनितीवर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष जो आदेश देईल, ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन.”
त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेता अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर व शिक्षादेवी ढक्का, संगीता पाजगे, विनोद रत्नपारखे, जगदीश भारतीया, विजय चौधरी, सरपंच गोविंद पवार, संतोष देव्हडे, ज्ञानेश्वर मोरे, समाधान शेजुळ, बाळूकाका सिरसाट यांचाही समावेश होता.
हा पक्षप्रवेश केवळ वैयक्तिक नव्हे तर संघटन पातळीवर भाजपाचे एक शक्तिप्रदर्शन ठरले.
या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, संजय केनेकर, नारायण कुचे हेही उपस्थित होते. त्यांनी गोरंट्याल यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, “महायुती सरकार आता जालन्यातील रखडलेले प्रश्न थेट मार्गी लावणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश म्हणजे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेसच्या गडाला पडलेली सुरुंगाची पहिली ठोस ठिणगी मानली जात आहे. काँग्रेससह इतर घटक पक्षांतील अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वातील कमकुवतपणा यामुळे कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओढा वाढत असल्याचे हे स्पष्ट उदाहरण आहे.