मुंबई
आजपासून दोन दिवस शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कार्यकर्ता शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी माध्यमांसमोर जितेंद्र आव्हाडांनी आपली खदखद व्यक्त केली आणि अजित पवारांच्या कथित अन्यायाचा पाढाच वाचला.
कोरोना काळात मला कोविडची लागणी झाली. त्यानंतर अवघ्या २ तासात मला पालकमंत्रीपदावरुन काढण्यात आलं. त्यानंतर तर किती मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली, मात्र त्यांचे पालकमंत्रीपद काढून का घेतले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवारांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला का? मी कोरोनातून बरा झालो ना, मेलो तर नाही ना, वर गेलो नाही ना.. मग मलाच अशी वागणूक का?
याशिवाय आव्हाड यावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदावरील आपला राग व्यक्त केला. अजित पवार यांना रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना द्यायचे होते, त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच मला पालकमंत्रीपद मिळणार नाही याची तजवीज केली होती, असे ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे मिळून पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेत होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माझी भेट घेतली, त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला रायगडचे पालकमंत्रीपद हवे होते, त्यामुळे आम्ही तुम्हाला पालघरचे पालकमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली. शरद पवार होते त्यामुळे मी पक्षात राहू शकलो, अन्यथा यांनी मला कधीच बाहेर काढलं असतं.
 
								 
                                 
                         
                            
