घाटकोपर, मुंबई – मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे उर्फ “नशा खुबे” यांच्याविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे जोरदार “जोडे मारो आंदोलन” छेडण्यात आले. मराठी भाषेवर केलेल्या टीकेविरोधात आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्या वक्तव्यामुळे या खासदाराला चपलेचा ‘सन्मान’ देण्यात आला.
घाटकोपर पश्चिमेतील वेलकम हॉटेल परिसरात पार पडलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केलं. आंदोलनादरम्यान निशिकांत दुबे यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी चपलांनी ‘प्रणाम’ केला आणि “मराठीचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
भाजपचा ‘बिहार निवडणुका आणि महाराष्ट्रात आग’ हा जुना खेळ पुन्हा सुरू झाल्याचं सांगत आंदोलकांनी म्हटलं की, “मराठी जनतेच्या भावना चिथवणं हेच भाजपचं राजकारण आहे.” मात्र, यावेळी महाराष्ट्र गप्प बसला नाही. मराठी युवकांनी हातात जोडे घेत ठणकावून सांगितलं – “अस्मितेवर बोललात, तर उत्तर तोंडावर मिळेल!”
या आंदोलनात ॲड. मातेले यांच्यासोबत युवक काँग्रेसचे मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, मयूर केणी, प्रशांत कालेकर, विजय येवले, इक्रार चौधरी, इम्रान खान, अक्षय खिल्लारी, कार्तिक घोंगे, नवनाथ सकपाळ, अनुरभाई दळवी, सिराजभाई अहमद, इम्रान तडवी, हानीफ पटेल, प्रेमकुमार तायडे, विकास वाघमारे आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. अमोल मातेले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही लढाई केवळ निशिकांत दुबे यांच्यापुरती नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे. जो कोणी मराठी माणसाला कमी लेखेल, तो जोडा खात बसेल.”
या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
• मराठी भाषेचा व अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही.
• भाजपकडून महाराष्ट्राला सातत्याने दुय्यम वागणूक.
• निवडणुकांसाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न.
• केंद्रात सत्ता असूनही महाराष्ट्रातील युवकांमध्ये आत्मसन्मानाचा अंगार कायम.
या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी स्वाभिमानावर आघात करणाऱ्यांना चपलांनी उत्तर देण्याचा निर्धार युवकांनी दाखवून दिला. “नशा खुबे”सारख्या खासदारांना घाटकोपरच्या रस्त्यावरून मिळालेलं हे उत्तर महाराष्ट्रभर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.