मुंबई – : जोगेश्वरी (पूर्व) येथील सीटीएस क्रमांक ४५ आणि ४८ असलेल्या जमिनीवरील विकासकामासाठी बिल्डर ग्यानप्रकाश शुक्ला एलएलपी यांनी परवानगी मिळविताना अनियमितता केली असेल तर त्याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. एसआरएच्या नकाशात ९ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ६ मीटरचा रस्ता असताना अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत अग्निशमन विभागात परवानगी मिळवण्यासाठी लाचलुचपत होत असल्याचा आरोप केला. संबंधित विकासकाने महापालिका आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या, तसेच या प्रकरणाशी संबंधित एका शिपायाचा मृत्यू संशयास्पद असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
प्रभू यांनी संतप्तपणे प्रश्न उपस्थित करत “हा विकासक कोण? सरकारचा जावई आहे का?” असा सवाल केला आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मूळ लक्षवेधी सूचना अग्निशमन विभागाच्या परवानगीसंदर्भात असली तरी सदस्यांनी मांडलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे. कोणाचीही गय न करता चौकशी करण्यात येईल आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

