अजितदादा पवारांचा सकारात्मक प्रतिसाद; अर्थ खाते, राज्य सहकारी बँक व नाबार्डसोबत लवकरच निर्णय
मुंबई: – बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोण सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्र्यांनी अर्थ खाते, राज्य सहकारी बँक आणि नाबार्डसोबत चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री नरहरी झिरवळ, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य ठळक मुद्दे:
• ३०० कोटींचे सॉफ्ट लोण: कृषी व अकृषी कर्जपुरवठ्यासाठी राज्य सहकारी बँकेमार्फत मदत द्यावी.
• १५ कोटींची विशेष मदत: बँकेच्या शाखांसाठी आधुनिक तांत्रिक व भौतिक सुविधांसाठी मदत देण्याची मागणी.
• थकबाकी वितरण : विविध योजनांतर्गत बँकेस मिळणाऱ्या ३२ कोटी रुपयांच्या थकबाकीचे ३१ मार्चपूर्वी वितरण करण्याचा निर्णय.
• विशेष अधिकारी नेमणूक: बँकेच्या कार्यक्षमतेसाठी सहकार विभागाकडून तज्ञ अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय.
बीड जिल्हा बँकेने सुधारित वसुली आणि दर्जा उन्नती करून चांगले काम केले आहे, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासक मंडळाचे कौतुक केले.