मुंबई: राज्यातील बेस्ट, एसटी, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये दिव्यांग प्रवाशांना सवलतींचा लाभ दिला जातो; मात्र मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना या सवलती लागू नसल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील दिव्यांग प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला आहे. इतर सर्व वाहतूक सेवांप्रमाणे मेट्रोमध्ये सूट न मिळाल्याने त्यांना प्रवासासाठी अतिरिक्त खर्च आणि मानसिक ताण सहन करावा लागत असल्याचे कैतके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
“एकीकडे राज्याने दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले, आणि दुसरीकडे मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीत सवलतीपासून दिव्यांग वगळले गेले — हे अन्यायकारक आहे,” असे कैतके म्हणाले.
सध्या बेस्ट आणि मनपाच्या बस सेवांमध्ये प्रवास सवलतींचा लाभ मिळतो. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवासाची मुभा आहे. तसेच, लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये ८० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या प्रवाशांना ७० टक्के सवलत, तर त्यांच्या मदतनीसांना ५० टक्के सवलत दिली जाते.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो ७ आणि २A मार्गांवर २५ टक्के सवलत लागू केली होती. मात्र, नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रो ३ मार्गावर हीच सवलत अद्याप लागू झालेली नाही, असे कैतके यांनी निदर्शनास आणले.
कैतके यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, RPWD कायदा २०१६ आणि UNCRPD करारानुसार दिव्यांग नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीत सवलत देणे ही शासनाची जबाबदारी आहे.
“दिव्यांग प्रवाशांसाठी प्रवाससुलभता ही कृपा नव्हे, तर त्यांचा मूलभूत हक्क आहे,” असे कैतके यांनी म्हटले.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, मुंबई मेट्रो प्रशासनास स्पष्ट निर्देश देऊन सवलतीसंबंधी धोरण आणि कार्यपद्धती तातडीने जाहीर करावी.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची तत्काळ दखल घेतली असून, संबंधित विभागांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिव्यांग प्रवाशांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा कैतके यांनी व्यक्त केली.