मुंबई: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन केले जाईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग आणि लोकप्रतिनिधी यांची लवकरच व्यापक बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विधान परिषदेत आमदार श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. या चर्चेत त्यांनी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, कोरोना नंतर वृत्तपत्र उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या अडचणी, रोजगाराचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचे रखडलेले प्रस्ताव, तसेच वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना आयकरात सवलत देण्याची मागणी यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला.
याशिवाय पत्रकारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, गृहनिर्माण योजनेंतर्गत पत्रकारांना घरे देणे आणि वृत्तपत्र जाहिरातीवरील जीएसटी रद्द करण्याची मागणीही त्यांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांच्यावतीने उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी घेतला आहे. या विषयात विविध खात्यांचा समन्वय आवश्यक असल्याने प्रक्रिया सुरू असून पुढील अधिवेशनाच्या आत ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे स्थान चौथ्या स्तंभाचे आहे. कोरोना काळात वृत्तपत्र क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे.
दरम्यान, या चर्चेत आमदार सतेज पाटील आणि अन्य सदस्यांनीही सहभाग घेत बाळशास्त्री जांभेकर पेन्शन योजनेतील विलंब आणि काही अटींबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली.
यावर उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, हे विषय विविध खात्यांशी संबंधित असल्याने सर्व विभागांची संयुक्त बैठक पुढील अधिवेशनाच्या आत घेण्यात येईल, ज्यामध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाईल.
Srikanth Bharatiya question

