मुंबई : संपूर्ण देशासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षांपासून ऐकतोय, गातोय. त्यामुळे महाराष्ट्रासाठी शिवजंयती त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन हा मोठ्या उत्साहाने शिवमय वातावरणात किल्ले रायगडावर साजरा केला जातो .यंदा शिवराज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण असून यानिमित्ताने रायगडावरही तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखोहुन अधिक शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वदन करण्यासाठी रायगडावर जमा झाले आहेत.
अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे..छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे .या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.अनेक शाहीर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. एकूणच किल्ले रायगडावर वातावरण अगदी शिवमय झालं आहे.
ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून निघाला आहे. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनी शिवभक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे. सुमारे दोन लाख शिवभक्त रायगडावर आल्याने सर्वांनी शिस्तबद्धपणे शिवरायांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आलेले आहे या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल झाल्या आहेत.