मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला आहे . महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले आहे . या निकालात राज्यात भाजपाप्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला आहे . भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. त्यामुळे एनडीएकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले( Nana Patole ) यांनी मोठा दावा केला आहे.केंद्रात सरकार स्थापन करण्यास आमचा फॉर्म्युला तयार असल्याचं मोठं वक्तव्य पटोले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
इंडिया आघाडीच्या होणाऱ्या दिल्लीतील बैठकीसाठी आम्ही दिल्लीला जाणार आहोत. सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमचे सर्व नवनिर्वाचित खासदार सुद्धा उद्या परवा, मुंबईला जमा होतील. आणि तिथून सगळं प्लॅनिंग केल्या जाईल. राष्ट्रपती महोदयांनी इंडिया आघाडीच्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याबाबत बोलावले तर, इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल, असा दावा पटोले यांनी केला आहे . तसेच आम्ही देशातील सर्वात मोठा पक्ष आहोत. आम्हीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे.सगळे खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. दिल्लीत सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा दावा पटोले यांनी केला आहे.
या महाविकास आघाडीत काँग्रेस काल मोठा भाऊ होता. आजही मोठा भाऊ आहे. उद्याच्या विधानसभेतही मोठा भाऊ असेल. जागा वाटपातही काँग्रेस मोठा भाऊ होता. कालपर्यंत आमच्यासोबत गट होते. आता पक्ष होतील, असा टोला नाना पटोले यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही मोठे भाऊ आहोत. लहान भावाने लहान भावासारखंच वागावं, असा चिमटाही त्यांनी काढला.