शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद, कर्जमाफी व पीक विम्याच्या मागण्यांसाठी लढ्याचा संकल्प
वर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे केंद्र असलेल्या विदर्भातील प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्यांचा आजपासून विदर्भ दौरा सुरू झाला. महात्मा गांधींच्या सेवाग्राम (वर्धा) येथून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.
हा दौरा तीन दिवसांचा असून पंजाब, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील २३ राष्ट्रीय शेतकरी नेते यात सहभागी झाले आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, विजू कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडत आहे.
दौऱ्याचे स्वरूप
• आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद
• गावोगावी शेतकऱ्यांशी चर्चा
• कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी
• पत्रकार परिषदा
• शेती अभ्यासकांशी चर्चा
• वर्धा, अमरावती व अकोला येथे जाहीर सभा
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शिष्टमंडळाने नागापूर गावात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
पहिली सभा वर्ध्यात
सत्यनारायण वाचनालय सभागृहात झालेल्या सभेत राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, विजय जावंधिया, विजू कृष्णन, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, परमितसिंग मेहमा, किशोर ढमाले आदींनी शेतकऱ्यांना संबोधित केले.
सभेत खालील मागण्यांवर ठाम भूमिका घेण्यात आली:
• शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी
• शेतीमालाला रास्त भाव
• जमीन अधिग्रहणाला विरोध
• शेतकरी हिताचा पीक विमा
सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून राज्यात आरपार आंदोलन उभारण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
टिकैत आणि ढवळे यांची टीका
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले –
“उत्तर भारतात जशी शेतकरी आंदोलने झाली, त्याच चिकाटीने महाराष्ट्रातही लढा उभा राहील. या आंदोलनाला आम्ही पूर्ण ताकद देऊ.”
शेतकरी सभा संबोधित करताना डॉ. अशोक ढवळे यांनी टीका केली. “ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धाचा कापूस उत्पादकांवर घातक परिणाम होणार आहे. त्यावर मोदी सरकारने कापडावरील आयात कर रद्द करून आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम केले आहे. राज्यातील ‘देवा भाऊ’ आणि केंद्रातील ‘मोदी भाऊ’ मिळून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. याविरोधात संयुक्त किसान मोर्चा आरपार लढा उभारेल.”
स्थानिकांचा सहभाग
यशवंत झाडे, अविनाश काकडे, उमेश देशमुख, सुनील मालुसरे, भैय्या देशकर, शाम भेंडे, गोपाल दुधाने, महेंद्र मुनेश्वर, प्रवीण भोयर, अमीर अली अजानी, रेखा झाडे, दुर्गा काकडे, सुनील घिमे, चंद्रकांत ढगे, अतुल शर्मा, जितेंद्र चोपडे आदींनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सभा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

