Twitter : @therajkaran
मुंबई
नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू तर छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाले. राज्यातील सरकारच्या रुग्णालयात मिळून ४१ मृत्यू झाले. यामुळे राज्य सरकारची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याची टीका चहू बाजूंनी होत आहे. गंभीर स्थितीत रुग्ण आणल्याने, किंवा औषधांचा तुटवडा असल्याने ही पारंपारिक कारणे देणे बंद करून यंत्रणेची तयारी कितपत आहे, असा सवाल मंत्र्यांपासून ते वैद्यकीय संचालकांना करण्याची हीच वेळ असल्याची टिका सरकारी यंत्रणेतील अनुभवी तसेच निवृत्त ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी करत आहेत.
यावर बोलताना राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, रुग्ण गंभीर स्वरुपात आले म्हणून त्यांचा मृत्यू झाला, असे सांगणे योग्य नसून आपली तयारी कितपत आहे, असा सवाल करणे आवश्यक आहे. वैद्यकीय संचालकांनी, किंवा ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी याची चाचपणी कधी केली आहे का? असे गंभीर रुग्ण येतच राहणार. यावर गंभीर रुग्ण आले म्हणून त्यांचा मृत्यू झाला, हे उत्तर देणे योग्य नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयात गंभीर स्वरुपातील रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात या रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. शिवाय ज्यांच्याकडे पैसे नाहीत, असे रुग्ण खासगी रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्ण सरकारी रुग्णालयात उपाचारासाठी येणे नैसर्गिक आहे. मात्र अशा गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपण कितपत तयारीत आहोत, असा सवाल संबंधित मंत्र्यांना तसेच शासकीय यंत्रणेला करण्याची हीच वेळ असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
डॉक्टर, मंत्री अधिष्ठाता, वैद्यकीय संचालकांना, सचिवांना अशा ज्येष्ठ पातळीवर मार्गदर्शन करणारी यंत्रणाच नसल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले. यासाठी शासकीय यंत्रणेची तयारी आवश्यक आहे. योग्यऔषधे, योग्य यंत्रे, ऑक्सीजन, प्रशिक्षीत मनुष्यबळ या सर्व पातळ्यावर तयारी हवी. जर ५० टक्के जागाच रिक्त ठेवत असाल तर दुपटी- चौपटीने ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर जबाबदारी टाकली तर त्यांच्याकडून त्या दर्जाची सेवा होणार आहे का? असा सवालही उपस्थित केला.