X : @therajkaran
मुंबई – सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला (Gold medalist Rahi Sarnobat) वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद (Martyr Major Anuj Sood) यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मुद्याआधारे वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वडेट्टीवार म्हणाले, सुवर्णपदक विजेती राही सरनोबत शासकीय सेवेत असूनही रुजू झाल्यापासून तिला वेतन मिळत नाही. शहीद मेजर अनुज सुद यांच्या कुटुंबियांना मदतीपासून डावलले जात आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.
जम्मू – काश्मीरमधल्या कुपवाडा इथे दहशतवाद्यांशी लढताना २ जुलै २०२० रोजी तीस वर्षांचे सूद शहीद झाले. ते सन २००५ मध्ये कुटुंबीयांसह पुण्यात वास्तव्यास होते. मात्र शहीद सैनिकांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून मिळणारे भत्ते आणि लाभ सुद यांच्या पत्नीला नाकारण्यात आले. सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या राहीला वेतन मिळत नाही. मात्र विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला अकरा कोटी रुपये देतात.
शहीद सुद यांच्या बाबतीत सरकारच्या धोरणाबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयाने विशेष बाब म्हणून या प्रकरणाकडे सरकारने बघावे अशी नोंद केली, तरीही शिंदे सरकारने धोरणात्मक निर्णयाचे कारण देत टाळाटाळ केली. कोर्टाच्या निर्देशानंतरही सूद कुटुंबाला वणवण भटकावे लागत आहे. तिजोरी खाली असताना अकरा कोटी रुपये खिरापत वाटली तसे यांना फार लागणार नाही. त्यामुळे नेमबाज राही सरनोबतला वेतन देण्यात यावे व शहीद सूदच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत करावी असे पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.