मुंबई
महायुतीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्याच्या चर्चांनी अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामागे महायुतीचा मनसुबा काय असू शकतो, याचे अंदाज बांधले जात आहे.
राहुल नार्वेकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असं घडलं तर नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्याठिकाणी नव्या व्यक्तीची नियुक्ती करून आमदार अपात्रता प्रकरण लांबणीवर टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देणं अपेक्षित आहे. हा निकाल लांबणीवर जाण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी राहुल नार्वेकर यांनी ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाऊन भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांची भेट घेणं कितपत योग्य याबाबत राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे.
आमदार अपात्रता प्रकरण महायुतीच्या अडचणी वाढवू शकतं, दरम्यान हा निकाल लांबणीवर टाकण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठीही राहूल नार्वेकरांना लोकसभेचं तिकीट दिलं जातंय का, असाही सवाल उपस्थित होत आहे.