महाराष्ट्र ताज्या बातम्या

पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल – रामशेठ ठाकूर

मुंबई: बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्षणभर विश्रांती मिळावी, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करत माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

हे विश्रामधाम भविष्यात पत्रकारांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे केंद्र बनेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी २० लाख रुपयांची वैयक्तिक देणगी जाहीर केली. या नूतनीकरण प्रकल्पासाठी रामशेठ ठाकूर यांनी आतापर्यंत एकूण ७० लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. तसेच कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनीही या उपक्रमासाठी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

लोणावळा येथील विश्रामधाम नूतनीकरणाच्या पायाभरणी समारंभात रामशेठ ठाकूर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार नेते महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पन्नास वर्षांपूर्वी विश्रामधाम उभारणीत सक्रिय सहभाग असलेले माजी अध्यक्ष कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अजय वैद्य, प्रकल्प निरीक्षक दीपक म्हात्रे, वास्तुविशारद मनोज गोलतकर, राजू माळी, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी सदस्य आणि अनेक पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार संघाच्या लोणावळा येथील विश्रामधामाला ‘थ्री-स्टार’ दर्जा देण्याचा शब्द विद्यमान कार्यकारिणीने दिला होता. विद्यमान व माजी अध्यक्ष, विश्वस्त आणि सदस्यांच्या सूचनांचा विचार करून या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मुंबई मराठी पत्रकार संघाने पहिले ठोस पाऊल उचलले आहे. या प्रकल्पाची पायाभरणी रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले की, “हे अद्ययावत विश्रामधाम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.”

दी. गो. तेंडुलकर यांच्या स्मृती केंद्रासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ साली एक हजार रुपयांची देणगी दिली होती. गेल्या ५० वर्षांत या विश्रामधामाने अनेक आठवणी जपल्या आहेत, त्यामुळे हा जिव्हाळा कायम ठेवतच नूतनीकरण केले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले, “पत्रकारांच्या या विश्रामधामाच्या उभारणीत अनेकांचे श्रम आहेत. मी रामशेठजींच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यातर्फे ५ लाखांची देणगी देत असून भविष्यातही पत्रकार संघासोबत कायम जोडलेला राहीन.”

माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी सांगितले की, “या वास्तूच्या उभारणीसाठी तत्कालीन कार्यकारिणीने खूप हालअपेष्टा सोसल्या. त्या सर्वांच्या वतीने हा सत्कार स्वीकारतो.” कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असतानाच विश्रामधाम नूतनीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे. यासाठी सर्व कार्यकारिणी व विश्वस्तांचे आम्ही आभारी आहोत.” निवेदन स्वाती घोसाळकर यांनी केले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाच्या कलावंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी कलावंत: देवदास मटाले, स्वाती घोसाळकर, रश्मी महांबरे, प्रशांत चिडे, सिद्धेश शिगवण, सुरेश ठुकरूल आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड. हा सत्कार रामशेठ ठाकूर आणि महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आला.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात