मुंबई : “‘माध्यमभूषण’ या पुस्तकातून विविध माध्यमांतील कार्यकर्त्यांच्या जीवनकथांचा वेध घेतल्यामुळे त्या त्या माध्यमांचे अंतरंग आणि मागील पडद्यामागचे परिश्रम वाचकांना समजून घेता येतील,” असा विश्वास विवेक मासिकाचे संपादक रवींद्र गोळे यांनी व्यक्त केला.
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका समारंभात रवींद्र गोळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ‘माध्यमभूषण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी श्री. गोळे बोलत होते.
श्री गोळे पुढे म्हणाले, “विविध माध्यमांमधून अनेक घटना, प्रसंग आणि सेलिब्रिटींच्या कथा आपण रोज अनुभवत असतो. पण हे सर्व सादर करणारे पत्रकार, कॅमेरामन, संपादक, तंत्रज्ञ हे मात्र कायम पडद्यामागे राहतात. ‘माध्यमभूषण’ या पुस्तकामुळे अशा व्यक्तींचे अमूल्य आणि अपरिहार्य योगदान वाचकांसमोर येईल.”
अमेरिकास्थित ज्येष्ठ अभियंते आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विनोद बापट म्हणाले, “या पुस्तकात भारतासोबतच अमेरिका, सिंगापूर आणि नेदरलँड्समधील माध्यमकर्मींच्या जीवनकथांचा समावेश आहे. त्यामुळे त्या देशांतील समाजरचना आणि भारतीय माध्यमकर्मींचे जागतिक योगदान याची झलक वाचकांना मिळेल.”
‘रामायण’ मालिकेचे सुप्रसिद्ध कॅमेरामन अजित नाईक म्हणाले, “आम्ही आयुष्यभर कॅमेऱ्यामागे राहून काम केले, पण या पुस्तकामुळे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलो. तंत्रज्ञांच्या वतीने या पुस्तकाच्या लेखकांचे मनापासून आभार.
दूरदर्शनच्या निर्माती मीना गोखले म्हणाल्या, “देवेंद्र आणि अलका भुजबळ यांनी निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता विविध माध्यमांद्वारे समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. समाजप्रबोधनासाठी त्यांचे योगदान स्तुत्य आहे.”
प्रास्ताविक करताना, पुस्तकाचे लेखक देवेंद्र भुजबळ म्हणाले, “आपल्या आयुष्यात भेटलेल्या आणि भावलेल्या व्यक्तींविषयी या पुस्तकात लिहिले आहे. खरं तर, या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल इतके त्यांचे कार्य मोठे आहे. या पुस्तकाची सुंदर निर्मिती केल्याबद्दल मी ग्रंथाली प्रकाशनचे मनःपूर्वक आभार मानतो.
या पुस्तकात माध्यमविश्वातील खालील व्यक्तींच्या प्रेरक जीवनकथा समाविष्ट आहेत –
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, याकूब सईद, प्रा. सुरेश पुरी, प्रदीप दीक्षित, अण्णा बेटावदकर, वासंती वर्तक, प्रकाश बाळ जोशी, डॉ. किरण चित्रे, बी. एन. कुमार, शिवाजी फुलसुंदर, मधु कांबळे, डॉ. महेश केळुस्कर, अविनाश पाठक, रोनिता टोरकाटो, अजित नाईक, नितीन सोनवणे, प्रणिता देशपांडे (नेदरलँड्स), शोभा जयपुरकर, विनय वैराळे, विनोद गणात्रा, सिद्धार्थ कुलकर्णी, किसान हासे, माधव गोगावले (अमेरिका), प्रा. डॉ. सुचिता पाटील, रत्नाकर तारदाळकर, मेघना साने, राजू झणके, रणजीत चंदेल, शिवानी गोंडाळ, नितीन बिनेकर, स्मिता गव्हाणकर, मर्मबंधा गव्हाणे, नीला बर्वे (सिंगापूर), सुदेश हिंगलासपुरकर, मीना घोडविंदे आणि डॉ. सुलोचना गवांदे (अमेरिका).
‘माध्यमभूषण’ हे पुस्तक केवळ पत्रकारिता किंवा चित्रपट यांपुरते मर्यादित नाही, तर माध्यम क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाचा गौरव करणारे आहे. समाजात सकारात्मकता, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांचा संदेश देणारे हे पुस्तक “माध्यमांचे अंतरंग उलगडणारे आरसे” ठरणार आहे.