नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले की, माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं आणि असंवेदनशील वागणूक सतत चर्चेत असते. शेतकऱ्यांशी अरेरावीने बोलणे असो किंवा कर्जमाफीच्या संदर्भात असंवेदनशील विधान करणे असो, कोकाटे यांनी शेतकऱ्यांची सातत्याने थट्टा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
आयत्या वेळेला राज्याच्या विधानसभेत गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना ऑनलाईन रमी खेळण्याचा प्रकारही त्यांनी केल्याचे निदर्शनास आणून दिले. “हे वागणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय परंपरेला काळीमा फासणारे आहे,” असे महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले.
कोकाटे यांच्या असंवेदनशील वागणुकीमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून शेतकऱ्यांच्या हितालाही बाधा पोहोचत आहे. त्यामुळे कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्या जागी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला संवेदनशील मंत्री द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली.
या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही ही मागणी सोशल मीडियावर मांडली असून त्यांनी @ChouhanShivraj आणि @CMOMaharashtra यांना टॅग केले आहे.