महाड – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुका आणि शहरातील राजकीय समीकरणात अनपेक्षित उलथापालथ झाली आहे. महाड नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण तसेच पंचायत समिती सभापतीपद ओबीसी महिला आरक्षण अशा गटात पडल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचे स्वप्नभंग झाल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर नगराध्यक्षपदासाठी तयारीला लागलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते धक्का खाल्ल्यासारखे झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, तसेच विरोधी पक्षातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सर्व पक्षांतील सामान्य प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांचे मनोधैर्य खचले आहे.
महाड नगराध्यक्षपद ओबीसी गटात गेल्यानंतर पंचायत समिती सभापतीपदावर देखील ओबीसी महिलांचे आरक्षण पडल्याने सत्ताधारी व विरोधी गटातील अनेक अनुभवी तसेच तरुण, तडफदार नेत्यांची गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून अनेक पक्षातील नेते आपल्या घरच्या मुला-मुलींना सभापती बनवण्यासाठी नियोजन आखत होते. कोणत्या गणातून उमेदवार उभे करायचे यासाठी गुप्त चाचपणी आणि बैठकाही सुरू होत्या. मात्र आरक्षणाच्या घोषणेमुळे सर्व प्रयत्न पाण्यात गेल्याची चर्चा आता महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात जोरात रंगली आहे.