महाआरोग्य २०२६ मध्ये उल्लेखनीय यश
महाड: महाराष्ट्र शासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान पुरस्कार सोहळ्यात महाडच्या ग्रामीण रुग्णालयाला आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सोहळ्यात बेड ऑक्युपन्सी रेशो, आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवा, मोठ्या व लहान शस्त्रक्रिया, स्वाभाविक व सिझेरियन प्रसूती, तसेच रुग्णालयीन स्वच्छता आदी निकषांच्या आधारे निवड करण्यात आली. या सर्व निकषांमध्ये दर्जेदार व लोकाभिमुख कामगिरी केल्याने रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालय या पुरस्कारास पात्र ठरले.
ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर, महाड येथे उत्कृष्ट सेवा देत असल्याची दखल घेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारताना ग्रामीण रुग्णालय महाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंतनु डोईफोडे, परिसेविका विद्या पालकर, प्रसाद पाटील, अधिपरिचारक उदय पवार, कक्षसेवक वैभव नगरकर व वाहनचालक उपस्थित होते. या सन्मानामुळे महाडच्या ग्रामीण आरोग्य सेवेची मान अभिमानाने उंचावली आहे.
रायगड जिल्ह्यात अव्वल ठरले ग्रामीण रुग्णालय
सार्वजनिक आरोग्य सेवा, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाड ग्रामीण रुग्णालय रायगड जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि समाजहितातील योगदानाची दखल घेत महाआरोग्य सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला.

