सलग चार दिवस ठप्प मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, भाऊबीजीनिमित्त पाचव्या दिवशीही कोंडीची शक्यता
महाड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १८ वर्षांपासून अपूर्ण असून, त्याचा फटका दरवर्षी कोकणातील चाकरमान्यांना बसत आहे. यंदाच्या दिवाळी उत्सवातही तीच पुनरावृत्ती झाली आहे. मागील चार दिवसांपासून माणगाव परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गुरुवारी भाऊबीजीनिमित्त पुन्हा एकदा महामार्ग ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव परिसरात दोन्ही दिशांना दोन–दोन किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
या कोंडीतून माणगाव शहर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे.
पुण्याकडून येणारी वाहने देखील याच मार्गाने महाड आणि मुंबईच्या दिशेने जात असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. माणगाव एसटी आगारातून सुटणाऱ्या मुंबई आणि महाडकडे जाणाऱ्या एसटी बसांना थांबवावे लागत असून, त्यामुळे कोंडी अधिक वाढत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबई–पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. माणगावपासून खरवली फाटा आणि मुगवलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
भाऊबीजीनिमित्त भावंडांचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रवास पाहता, पाचव्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाहतूक पोलीस यंत्रणा मर्यादित मनुष्यबळामुळे कोंडी व्यवस्थापनात अपुरी पडत आहे. स्थानिकांनी माणगाव व इंदापूर बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली असून, तोपर्यंत चाकरमान्यांची सुटका होणार नाही, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
या वाहतूक कोंडीचा परिणाम रुग्णवाहिकांवरही होत आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रुग्णवाहिका एक–एक तास महामार्गावर अडकून राहतात, ज्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महिलांना आणि वृद्धांना तासन्तास वाहनात बसून राहावे लागत असल्याने परिस्थिती असह्य झाली आहे.
दरवर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांपूर्वी महामार्ग दुरुस्तीची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्ष कामाची गती न मिळाल्याने चाकरमानींची सहनशक्ती संपत चालली आहे.
“या महामार्गाच्या कोंडीतून आमची सुटका कधी होणार?”
असा प्रश्न आता मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी राज्य व केंद्र सरकारला विचारत आहेत.

