रमेश तडवी यांची ठाणे ग्रामीणमध्ये बदली
महाड: महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांकडून कथित जातीवाचक छळ होत असल्याचा आरोप करीत पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप अशोक भोसले यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्यांनी तेथेच संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे. कोणतीही पोलीस पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी पोलीस दलात आपला ठसा उमटवला आहे. भोसले यांना सुमारे २० वर्षांचा पोलीस सेवेचा अनुभव असून, गडचिरोली या नक्षलप्रभावित भागात त्यांनी दीड वर्ष सेवा बजावली आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण, नाशिक, नंदुरबार, नागपूर, सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
२०१७ पासून ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून, सलग दहा वर्षांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल २६ जानेवारी २०२५ रोजी त्यांना पोलीस संचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
महाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही देताना भोसले यांनी आगामी शिवजयंती, होळी, चवदारतळे सत्याग्रह दिन तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक व जातीय सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

