X : @milimane70
महाड: महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिंदे गटाने माफी मागितली नाही तर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार राडा झाला. ठाकरे गटाकडून आमदार गोगावले यांचा निषेध केला जाणार होता. याला विरोध म्हणून गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तप्त झाले. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी चालू झाल्याने अखेर दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास देखील शिंदे गटाकडून विरोध झाला. याबाबत आज ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी येथील माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवगणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, विधानसभा सह संपर्क प्रमुख बाळ राऊळ, उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, तालुका प्रमुख आशिष फळसकर, चेतन पोटफोडे, जिल्हा महिला आदी उपस्थित होते.
अनिल नवघणे यांनी झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून स्व. बाळासाहेबांवर आक्षेप घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल असा इशारा दिला. शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना केलेला विरोध निषेधार्ह असून जोपर्यंत प्रशासन आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. माफी मागितली नाही तर जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्रित येतील आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.
छत्रपती शिवरायांना हार घालू न देणे आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर विरोध करणे म्हणजे शिवरायांचा अवमान आहे. त्यामुळे माफी तर मागितलीच पाहिजे, असे अनिल नवगणे म्हणाले. याबाबत शिंदे गटाकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया आली नसली तरी या घटनेवरून रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि पालघरसह संपूर्ण राज्यात यानिमित्ताने वातावरण तापेल, असा दावा केला जात आहे.
Also Rrad: मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा