नागपूर – मुंबई महानगरपालिका शाळांच्या कथित खासगीकरणासंदर्भातील मुद्दा आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात चांगलाच गाजला. राज्यमंत्री, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान न झाल्याने वातावरण तंग झाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “उत्तर चुकीचे वाटत असेल तर सदस्यांनी पुढील भूमिका घ्यावी” असे स्पष्ट निर्देश दिले.
मालाड (मुंबई उपनगर)चे आमदार अस्लम शेख यांनी उपप्रश्नातून गंभीर आरोप उपस्थित केला, “खासगीकरण धोरणाच्या आधारे चालणाऱ्या शाळांत शिक्षकांची पात्रता पूर्ण नाही. प्रशिक्षित नसलेल्या शिक्षकांकडून वरच्या वर्गांना अध्यापन चालले आहे, हे नियमबाह्य आहे.”
मूळ प्रश्नाला “खासगीकरण नाही” असे उत्तर देणाऱ्या राज्यमंत्री मिसाळ यांनी पुढे हा विषय “माझ्या खात्याशी संबंधित नाही” असे सांगितले. यामुळे सदस्यांची नाराजी आणखीनच वाढली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनपाने स्वतः धोरण आणल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “शिक्षण विषयक सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहून पुढील पावले ठरवू.”

पालकमंत्री लोढा यांनी मालवणी परिसरातील पालकांच्या आंदोलनाच्या वेळी स्वतः हस्तक्षेप केल्याची माहिती सभागृहाला दिली.
काँग्रेसचे अमिन पाटील म्हणाले, “कोणत्याही संस्थेने पालकत्व घेण्यास विरोध नाही, पण टेंडर प्रक्रिया पारदर्शक होती का? चौकशी केली पाहिजे.” तरीही राज्यमंत्री मिसाळ आपल्या उत्तरावर कायम राहिल्या की “या शाळांचे खासगीकरण झालेले नाही.”
उत्तरांमधील विसंगतीमुळे गोंधळ निर्माण झाल्याची सदस्यांनी नोंद घेतली. शेवटी अध्यक्ष नार्वेकर यांनी सदस्यांना “जर उत्तर समाधानकारक नसेल, तर योग्य ती भूमिका घ्या” असे निर्देश देत चर्चा संपवली.

